गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून दोन चिमुकल्या चुलत भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. तन्वी अविनाश मिसाळ (वय २), आयुष रवींद्र मिसाळ (वय ३) अशी मृत बालकांची नावे आहेत.
अमळनेर येथील रवींद्र मिसाळ व अविनाश मिसाळ या सख्ख्या भावांची शेती जायकवाडी बॅकवॉटर लगत आहे. त्यामुळे कुटुंब शेतवस्तीवरच वास्तव्यास आहे. रविवारी दुपारी तन्वी व आयुष ही दोन्ही मुले घराच्या अंगणात खेळत होती. खेळता खेळता कुटुंबीयांची नजर चुकवून ती शेजारी बँकवाटरच्या पाण्याच्या दिशेने गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा अचानक तोल गेला आणि ती खोल पाण्यात पडली. मुले सुरक्षित ठिकाणी खेळत असतील असा समज झाल्याने काही वेळ कुटुंबीयांचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. मात्र, तासभर उलटूनही मुले न दिसल्याने
शोधाशोध सुरू केली. बॅकवाटरच्या पाण्याजवळ दोन्ही मुले पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक वैभव इष्टके यांच्या मदतीने दोन्ही बालकांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे गंगापूर तालुक्यातील अमळनेर गावावर शोककळा पसरली. चिमुकल्यांच्या मृत्युने गावात रविवारी चूल पेटली नाही.
-- दोघेही चिमुकली भावंडे कुटुंबातील एकुलते एक --
मृत आयुष हा रवींद्र मिसाळ यांचा एकुलता एक मुलगा, तर तन्वी ही अविनाश मिसाळ यांची एकुलती एक मुलगी होती. मिसाळ कुटुंबातील दोन्ही भावांच्या घरचे एकुलती एक मुले अपघाती पद्धतीने हिरावल्याने कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी ५ वाजता अमळनेरवस्ती येथे दोन्ही चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.













